देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी डाक बंगल्यालगतच्या किशोर ट्रॉन्सपोर्टच्या गॅरेजच्या गाडीतून माल खाली करताना धाड घालून दोन लाख ८८ हजार २४० रूपयांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला. याप्रकरणी गाडीचालक व मालकास अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये लखन किशोर पंजवानी (२२) रा. सिंधी कॉलनी गोंदिया व प्रकाश व्यंकटराव डोहरे (४५) रा. झिंगारटोली जि. गोंदिया यांचा समावेश आहे. सदर दोघांनीही मेटॅडोर गाडी क्र. एमएच-४९-०१४१ या गाडीतून देसाईगंज येथील डाग बंगल्याजवळ १५ पेटी उतरत असताना झडती घेतली. त्यावेळी त्यांना १४४० पॅकेट सुगंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी ट्रॉन्सपोर्ट मालकाचा मुलगा व वाहनचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देसाईगंज बाजारपेठ गोंदिया बाजारपेठेशी जुळली असल्याने गोंदियावरून सर्व प्रकारच्या साहित्याची किशोर ट्रॉन्सपोर्ट गॅरेजच्या माध्यमातून आठवड्यातून सहा दिवस वाहतूक केली जाते. देसाईगंज येथील बाजारपेठेत माल पाठविताना गोंदिया येथील ट्रॉन्सपोर्ट गॅरेजमध्ये माल पाठविणारा बिल्टिची एक प्रत देतो व दुसरी प्रत त्याच्याकडे असते. देसाईगंज येथे सदर तंबाखूजन्य माल कोणत्या व्यापाऱ्यांकडे वितरित केला जाणार होता, याची माहिती देसाईगंज पोलीस घेत आहे. सहा लाखांच्या वाहनासह एकूण ९ लाख ८ हजार २४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज येथे लाखो रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थसाठा जप्त
By admin | Updated: May 14, 2015 01:12 IST