गडचिरोली : ओबीसींच्या समस्या सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू त्याचबरोबर संसदेतही हा प्रश्न लावून धरला जाईल, असे आश्वासन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले यांनी दिले.स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी खा. नाना पटोले यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या वेळी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी ओबीसींचे जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी अनेकवेळा आंदोलनही करण्यात आले. मात्र आश्वासनाच्या पलीकडे सरकार काहीच देत नसल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशानुसार पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील वर्ग ३ व ४ ची पदे भरता अनुसूचित जमाती या प्रवर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांची फारमोठी गोची झाली आहे. या दोन प्रमुख समस्यांसह ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससीएसटीप्रमाणे सर्व अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करणे, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान नाना पटोले यांनी राज्याशी संबंधित असलेले मुद्दे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, त्याचबरोबर संसदेतही याविरोधात आवाज उठविला जाईल, असे आश्वासन दिले. खासदार बनल्यानंतर आपण पहिले पत्र ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याबाबत केंद्र शासनाला लिहिले आहे. तर दुसरे पत्र राज्यस्तरावरही ओबीसींसाठी मंत्रालय सुरू करण्याबाबत राज्य शासनाला लिहिले आहे. स्वतंत्र मंत्रालय असल्यास कॅबिनेट दर्जाचा मंत्री म्हणून निधीची मागणी नोंदविता येते व समस्याही मांडण्यास सोयीस्कर होते, अशी माहिती दिली. ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजुला विसरून एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण मुनघाटे, बाबुराव कोहळे, प्रकाश इटनकर, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, दादाजी चापले, भाऊराव खिरटकर, नगरसेवक राजु कात्रटवार, न. प. उपाध्यक्ष रमेश चौधरी, जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, सुरेश मांडवगडे, बाबुराव बावणे, पांडुरंग घोटेकर, प्रा. शेषराव येलेकर, खुशाल वाघरे, डॉ. बुरे, संतोष बोलुवार, पुरूषोत्तम म्हस्के, पुरूषोत्तम झंझाळ, अविनाश गौरकार, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे, शालिकराम विधाते, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय बर्लावार आदी जवळपास ५० ते ६० ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
ओबीसींच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू
By admin | Updated: April 3, 2015 01:20 IST