प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आश्वासन : जंगल कामगार संस्थांची वनवृत्त कार्यालयात सभागडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात जंगल कामगार सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा आहे. या संस्थांवर हजारो नागरिकांचे पोट अवलंबून आहे. त्यामुळे संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आलोक मिश्रा यांनी दिले.स्थानिक वनवृत्त कार्यालयाच्या सभागृहात २ नोव्हेंबर रोजी २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता जंगल कामगार संस्थांना कामे वितरित करण्याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक बी. जी. सिंह, गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य प्रादेशिक वन संरक्षक कल्याणकुमार, चंद्रपूर वन वृत्ताचे एस. पी. ठाकरे, जिल्हा संघाचे अध्यक्ष माजी खा. मारोतराव कोवासे, राज्य संघाचे अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, उपाध्यक्ष हरिराम वरखडे, संचालक घनश्याम मडावी, जिल्हा संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, राज्य संघाचे सचिव कटरे, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, आलापल्लीचे उपवनसंरक्षक मीना, भामरागडचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण, देसाईगंजचे उपवनसंरक्षक होशिंग, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक ठाकरे, चंद्रपुरचे वनाधिकारी झोडगे आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा. मारोतराव कोवासे व हरिराम वरखडे व टेकाम यांनी जंगल कामगार सहकारी संस्थांसमोर सध्या असलेल्या अडचणी मिश्रा यांच्यासमोर मांडल्या. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वन विभागाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याची बाब लक्षात आणून दिली. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल कामगार संस्था हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या संस्था बंद पडल्यास हजारो नागरिकांच्या रोजगारावर गदा येईल, त्यामुळे या संस्था जिवंत ठेवणे व सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचीही बाब इतर सदस्यांनी लक्षात आणून दिली. संचालन वनवृत्त कार्यालयात लेखापाल मैंद, जिल्हा संघाचे सचिव एन. झेड जांभुळकर यांनी तर आभार विभागीय वनाधिकारी कोवे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
जंकास संस्था बळकट करू
By admin | Updated: November 3, 2015 00:45 IST