गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यात १६ मार्च रोजी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील १९ रेतीघाटाच्या लिलावासाठी ई-निविदा घेऊन आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र कंत्राटदारांनी दुर्गम व अतिदुर्गम भागातील रेतीघाटाकडे पाठ फिरविल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात केवळ चार रेतीघाटांची विक्री झाली. कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे शासनाच्या महसुलावर परिणाम होणार असल्याचे चिन्ह आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन २०१४-१५ या वर्षाकरिता विक्रीसाठी एकूण ७८ रेतीघाट ठेवण्यात आले होते. यापैकी लिलाव व फेरलिलावामध्ये एकूण ६३ रेतीघाटावर अपसेट किंमतीपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाल्यामुळे या घाटांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ७८ पैकी ६३ रेतीघाटाची विक्री झाल्यामुळे शासनाला एकूण सहा कोटी एक लाख ३३ हजार ८७६ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात ५३ रेती घाटांची विक्री झाली. दुसऱ्या टप्प्यात लिलाव प्रक्रिया सहा तर फेर लिलावाच्या तिसऱ्या टप्प्यात १९ पैकी केवळ चार रेती घाटाची विक्री झाली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यातील वनखी येथील खोब्रागडी नदीवरील रेतीघाट, सायगाव येथील वैनगंगा नदीवरील रेतीघाट, कुलकुली येथील खोब्रागडी नदीवरील रेतीघाट व कुरखेडा तालुक्यातील टिपागडी नदीवरील जयसिंगटोला रेतीघाटाचा समावेश आहे. वनखी रेतीघाटातून एक लाख ४३ हजार, सायगाव रेतीघाटातून एक लाख ६ हजार, कुलकुली रेतीघाटातून दोन लाख ८३ हजार व कुरखेडा तालुक्यातील जयसिंगटोला रेती घाटातून एक लाख ७७ हजार अपसेट किंमतीतून एकूण सात लाख ९ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.१६ मार्च २०१५ रोजी तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत दुर्गम व अतिदुर्गम भागातील १५ रेतीघाट अविक्रीत राहिले. यामध्ये अहेरी तालुक्यातील महागाव (बु.), एटापल्ली तालुक्यातील सेवारी, भामरागड तालुक्यातील भामरागड, चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी, एकोडी, देसाईगंज तालुक्यातील विसोरा, कोकडी, आरमोरी तालुक्यातील वैरागड, मेंढा, मांगदा, मुलुर रिठ, डोंगर सावंगी, रामपूर चक, पळसगाव, पुराडा आदी रेतीघाटांचा समावेश आहे. विक्री झालेल्या रेतीघाट कंत्राटदारांना रेती उत्खनन व वाहतुकीचा परवाने देण्यात आले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
रेतीघाट लिलावाकडे कंत्राटदाराची पाठ
By admin | Updated: April 1, 2015 01:30 IST