गडचिरोली विभागीय कार्यालयातील प्रकार : सहायक उपवनसंरक्षकाकडून कर्मचाऱ्यास शिविगाळ गडचिरोली : येथील वन विभागाच्या विभागीय कार्यालयातील सहायक उपवनसंरक्षक जे. एल. शिंदे यांनी कार्यालयातील बंडू वडेट्टीवार या कर्मचाऱ्याला शिविगाळ केली. त्यामुळे कार्यालयातील सर्वच वन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ११ ते २ वाजेपर्यंत कामबंद आंदोलन केले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील वनमजूर कृष्णा कोटपरिया याचा मृत्यू झाला. त्याला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सकाळी ११ वाजता विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र जमले होते. तेवढ्यात सहायक उपवनसंरक्षक जे. एल. शिंदे यांनी बंडू वडेट्टीवार यांना शिविगाळ केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. २ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. घटनेच्या वेळी उपवनसंरक्षक फुले हे दौऱ्यानिमित्त बाहेर गेले होते. विचार विनिमय केल्यानंतर सर्व कर्मचारी दुपारी २ वाजता कामावर परतले. या आंदोलनात विभागीय कार्यालयातील सुमारे ४० कर्मचारी सहभागी झाले होते. एखादा कर्मचारी काम करीत नसेल तर त्याच्यावर प्रशासकीय कारवाई जरूर करावी, मात्र सहायक उपवनसंरक्षक शिंदे हे नेहमीच कर्मचाऱ्यांना शिविगाळ करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपवसंरक्षक फुले यांना सादर केले जाणार आहे. शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्यास आणखी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के यांनी दिला आहे.
वनकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By admin | Updated: January 18, 2017 01:40 IST