प्रकाश इटनकर यांचा आरोप : विरोध काँग्रेसला महाग पडणार गडचिरोली : पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात विदर्भावर विकासाबाबत सातत्याने अन्याय केला. विदर्भाला दूजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे. सिंचन, रस्ते याचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. याला पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी जबाबदार असल्याचे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही सर्वात जुनी मागणी असून हा विषय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे अनेकदा मांडण्यात आला. अनेक आंदोलने झालीत. भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशात स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हा महत्त्वाचा राहिला आहे. या मुद्यामुळेच त्यांना विदर्भात चांगले यश आले. मात्र सरकार आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता खोटी ठरत आहे, असे जनतेच्या लक्षात आले आहे. विधानसभा व विधान परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाला केलेला विरोध हा विदर्भातील शेकडो काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असेही इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत जनमंच या संस्थेने सर्व भागात सर्वेक्षण केले. ९५ टक्के लोक स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजुने आहेत. असे असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विदर्भाच्या मागणीला विरोध करू नये, अन्यथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वैदर्भीय जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही इटनकर यांनी म्हटले आहे.
विदर्भाच्या मागासलेपणाला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:12 IST