गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र या कार्यालयाकडे विविध खेळांचे साहित्य उपलब्ध नसल्याने स्पर्धा घेण्यासाठी अडचण जाणवत आहे. सुमारे तीन लाख रूपये किमतीच्या क्रीडा साहित्य खरेदीचा प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयाकडे प्रलंबित आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत २७ नोव्हेंबर २०१४ रोजी यादीनिहाय तीन लाख रूपयाच्या किंमतीचे विविध क्रीडा साहित्य खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या नागपूर येथील उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र या क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी उपसंचालकाने अद्यापही मान्यता न दिल्यामुळे विविध क्रीडा साहित्याची खरेदी तुर्तास थंडबस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेले क्रीडा साहित्य अत्यंत कमी आहेत. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाला प्रचंड अडचण जाणवत आहे. क्रीडा साहित्य खरेदीच्या प्रस्तावात तीन लाखांच्या साहित्यामध्ये बॅडमिंटन रॉकेट, बॅडमिंटन शुटल क्वॉक, बॅडमिंटन नेट, व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल खांब, बॉक्सींग ग्लोव्स, बॉक्सींग फोकस पॅड, फुटबॉल, टेबल टेनिस रॉकेट, टेबल टेनिस नेट आदी साहित्यांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा विकासासाठी सर्व खेळांचे साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने उपसंचालक कार्यालयाने तत्काळ प्रस्तावाला मान्यता देण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
क्रीडा साहित्याची कमतरता
By admin | Updated: December 15, 2014 22:55 IST