गडचिरोली : उन्हाळा सुरू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे हाल होत असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णालय प्रशासनाने सध्या जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. उन्हाळ्यात महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे रक्तदान शिबिर पूर्णत: बंद होतात. तसेच फेब्रुवारी महिन्यांपासून शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवतो. जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे दररोज अनेक रूग्ण रक्त मागण्यासाठी येतात. शासकीय रक्तपेढीतून दररोज ४० ते ५० बॅग रक्त रूग्णांना दिले जाते. उन्हाळ्याच्या कालावधीत रक्त पेढीकडे रक्त वाढावे याकरिता व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शासकीय, निमशासकीय कार्यालयासह औद्योगिक परिसरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या काळात पोलीस मदत केंद्र, धार्मिक संस्था, सार्वजनिक ठिकाण, सामाजिक संस्था, सरकारी कार्यालय यांच्यामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या सिकलसेल, मलेरिया, बाळंतपण असणाऱ्या महिला यांना रक्ताची कमतरता व अडचणी जाणवत आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा
By admin | Updated: April 23, 2015 01:26 IST