उलाढाल वाढली : पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षदेसाईगंज : कुरखेडा येथील सट्टाकिंग देसाईगंज शहरात सक्रीय झाल्यामुळे देसाईगंजच्या मुख्य बाजारपेठेत सट्टापट्टीचा धंदा तेजीत आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.देसाईगंज शहरात अवैध सट्टा व्यवसाय जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातही याचे पाळेमुळे जोरदार पसरले असून बेकायदेशीररित्या मुख्य बाजारपेठेत कार्यालय उघडून चिटोऱ्याच्या भरवशावर हा धंदा सुरू आहे. ११ रूपयावर एक हजार रूपये विनासायास मिळत असल्याने अनेक कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, सुशिक्षीत बेरोजगार, कामगार तसेच हातावर आणून पानावर खाणारे मजूर सट्ट्यावर नशीब अजमाविण्यासाठी सज्ज आहेत. देसाईगंज शहरालगतच्या नैनपूर येथील सट्टा व्यावसायिकाचे देसाईगंज शहरातील सट्टाकिंगाशी फाटल्यामुळे त्याने कुरखेडाच्या सट्टाकिंगाशी हातमिळवणी करून १० रूपयावर एक हजार रूपये देणे सुरू केल्याने या धंद्यात आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अधिक ग्राहक आपल्याकडे सट्टा लावण्यासाठी यावे म्हणून मुख्य बाजारपेठेत कार्यालय उघडून शासनमान्य परवानाप्राप्त व्यवसाय असल्याचे भासविले जात आहे. शहराच्या मुख्य भागात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असूनही मुजोरपणे सट्टाकिंग धंदा वाढवित आहे. या अवैध सट्ट्यामुळे अनैतिक व्यवसायही वाढीला लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
कुरखेडाचा सट्टा व्यावसायिक देसाईगंजमध्ये सक्रिय
By admin | Updated: June 12, 2016 01:17 IST