गडचिरोली : प्रेयसीची गळा दाबून व तिक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी १ हजार रूपयाचा दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली.मंगेश गुरूदेव जुमनाके (२५) रा. वाकडी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रानमूल येथील कल्पना गजानन रायसिडाम या युतीशी वाकडी येथील मंगेश जुमनाके याचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या गडचिरोली येथे नेहमी भेटी व्हायच्या. दरम्यान त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मंगेश जुमनाके यांनी गडचिरोली येथील जनसेवा लॉजमधील २२४ क्रमांकाची खोली २५ जून २०१२ पासून आरक्षित केली होती. तेव्हापासून हे दोघेही जण सदर खोलीमध्ये राहत होते. दोन-तीन दिवसानंतर परीक्षा द्यायची असल्याचे लॉज मालकांना सांगून या दोघांनी खोली आरक्षित केली. दोन दिवस राहिल्याने २७ जूनला मंगेश जुमनाके हा एकटाच काही सामान घेऊन येतो म्हणून बॅग घेऊन खोलीला कुलूप लावून खोलीबाहेर पडला. त्यानंतर २८ जूनला ग्राहक आल्यामुळे लॉज मालक देवेंद्र बिसेन यांनी खोलीकडे जाऊन पाहिले असता, त्याला संशय आला. खोलीचे दार उघडल्यानंतर कल्पना रायसिडाम ही मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गडचिरोली पोलिसांनी आरोपी मंगेश जुमनाके याच्याविरोधात भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक सचिन इंगवले यांच्याकडे होता. त्यानंतर सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ झाले. आज शुक्रवारी या प्रकरणावर अंतिम सुनावणी होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. आर. शिरासाव यांनी आरोपी मंगेश जुमनाके याला जन्मठेप च १ हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
खुनी प्रियकराला जन्मठेप!
By admin | Updated: February 28, 2015 01:29 IST