आंदोलनाचा दिला इशारा : रूग्णकल्याण समितीच्या सभेत ठराव पारित कुरखेडा : कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांची रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावी, अशा प्रकारचा ठराव रूग्ण कल्याण समितीने बुधवारी पार पडलेल्या सभेदरम्यान घेतला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता ५० खाटांची आहे. मात्र यापेक्षा दुप्पट रूग्ण नेहमीच दाखल होतात. बाह्य रूग्ण विभागातसुद्धा मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी येतात. या रूग्णालयात सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी पाच पदे रिक्त आहेत. तसेच अधिपरिचारिकेचीसुद्धा १५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. वर्ग- ४ व एनआरएचएम अंतर्गत मंजूर पदेसुद्धा रिक्त असल्याने येथील व्यवस्था प्रभावित होत चालली आहे. कमी मनुष्यबळामुळे रूग्णांना सोयीसुविधा पुरवितांना अडचण निर्माण होत आहे. याबाबत समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबत ठराव पारित केला. शासनाने या रूग्णालयात तत्काळ कर्मचाऱ्यांची नेमणूक न केल्यास रूग्ण कल्याण समितीच्या नेतृत्त्वातच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे अशासकीय सदस्य धर्मदास उईके यांनी दिला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम होते. सभेदरम्यान रूग्णालय परिसरात अनाधिकृत वाहनांच्या पार्र्किंगवर प्रतिबंध लावणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थायी पोलीस चौकी उभारणे, आमदार निधीतून धर्मशाळेचे बांधकाम करणे, संदर्भ सेवेकरिता दोन रूग्णवाहिका देण्यात याव्या आदी ठराव पारित करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) यापूर्वीही अनेकवेळा पाठपुरावा रिक्त पदांमुळे उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची गैरसोय वाढत चालली आहे. त्याचबरोबर कार्यरत कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त कामाचा बोजा वाढत चालला असल्याने सदर कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात यावी, याबाबत अनेकवेळा रूग्ण कल्याण समितीच्या सभेत ठराव पारित करण्यात आले. व त्याचा पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने रिक्त पदांची समस्या कायम आहे.
कुरखेडा रूग्णालयातील रिक्त पदे भरा
By admin | Updated: August 5, 2016 01:16 IST