एआरटीओचे आवाहन : स्कूल बस समितीची सभा; सुरक्षेबाबत केली चर्चागडचिरोली : अनवधानाने स्कूल बसचा अपघात झाल्यास याबाबतची माहिती तत्काळ पालकवर्गाला देता यावी, यासाठी स्कूल बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या नावाची यादी, पत्ता, पालकाचा दूरध्वनी क्रमांक बसचालकाने जवळ बाळगावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी केले. जिल्हा स्कूल बस समितीची सभा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे ४ मार्च रोजी घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना फासे बोलत होते. सदर सभा निवासी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला उपशिक्षणाधिकारी निकम, खराटे, प्राचार्य संजय नार्लावार, संजय भांडारकर, उषा रामलिंगम, प्रमोद मंडल, गडचिरोली शहर वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत उपस्थित होते. सभेदरम्यान शालेय सत्र सुरू झाल्यावर स्कूल बसने नियम व अटींचे पूर्तता न केल्यास संयुक्त तपासणी हाती घेणे, शिक्षणाधिकारी यांच्या समितीच्या नियमित बैठका घेऊन अहवाल सादर करणे, स्कूल बसमध्ये मुलांची संख्या निर्धारित करणे, वाहनतळ, वाहन थांबे ठरविणे, शालेय परिवहन समितीने घेतलेल्या बैठकांचे इतिवृत्त सादर करणे, शाळांमध्ये पालकांना बैठकीस निमंत्रण करणे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक एन. जी. बनसोडे, संचालन सूर्यवंशी तर आभार हर्षल बदखल यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची माहिती स्कूल बसचालकाने ठेवावी
By admin | Updated: March 6, 2016 01:02 IST