व्यथा मांडल्या : शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाणल्या अडचणीगडचिरोली : पूर्व विदर्भातील बंगाली माध्यमांच्या ५६ प्राथमिक शाळांना नैसर्गीक वाढीचे आरटीई अंतर्गत वर्ग १ ते ५ पर्यंत बंगाली माध्यम सुरू करण्याबाबत तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ते आठ मध्ये एक पदवीधर बंगाली भाषिक शिक्षक नियुक्त करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती निखील भारत बंगाली उदवस्तू समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिली आहे. गडचिरोली, गोंदिया या जिल्हा परिषदमध्ये बंगाली माध्यमाचे ५६ प्राथमिक शाळांमध्ये वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षणाची सोय आहे. आरटीई निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण वर्ग १ ते ५ वीपर्यंत होत आहे. त्याचप्रमाणे बंगाली माध्यमाचे प्राथमिक शाळेत वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत आवश्यकतेनुसार बंगाली शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच शासन निर्णयानुसार बंगाली गावात उच्च प्राथमिक शाळेत वर्ग ५ ते ७ वी करीता प्रथम भाषा बंगाली असावी व याकरीता एका बंगाली भाषिक सहाय्यक शिक्षकाची नियुक्ती शासनाने मान्य केली आहे. परंतु आरटीई अंतर्गत उच्च प्राथमिक शाळेमध्ये वर्ग ६ ते ८ वी समाविष्ट करण्यात आल्याने बंगाली भाषिक शिक्षकाची नियुक्ती पदवीधर शिक्षकांमधून संबंधित जिल्हा परिषदांनी करावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्याकडे करण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेऊन आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या सचिव भिडे उपस्थित होत्या. यावेळी शिष्टमंडळात आमदार दीपक आत्राम, अपूर्व मुजूमदार, विजय बिश्वास, मधुसूदन सरकार, रणजित हलदार, गितालीचे सरपंच बासू मुजूमदार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
बंगाली शाळांना न्याय
By admin | Updated: July 10, 2014 23:35 IST