शिवसेनेचे नेतृत्व : सात गावांतील हजारो नागरिक मोर्चात रस्त्यावरदेसाईगंज : देसाईगंज उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील सात गावांमध्ये वन विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वात सात ग्रामपंचायतीच्या गावातील हजारो नागरिक एकत्र येऊन बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान ‘एफडीसीएम चले जाओ’ असा नारा देत जंगल वाचविण्यासाठी रखरखत्या उन्हात नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, जि. प. सदस्य छाया कुंभारे, अशोक इंदुरकर यांनी केले. वन विकास महामंडळाकडून देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव, चिखली, चिखली रिठ, कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर, शिरपूर व आरमोरी तालुक्यातील वैरागड, पाथरगोटा परिसरात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना विश्वासात न घेता सर्रास ३० घन मीटरपेक्षा जास्त गोलाई असलेल्या लाकडाची तोड केली जात आहे. याविरोधात स्थानिक ग्रामपंचायती, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांनी प्रखर विरोध दर्शविला. मात्र एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांकरवी गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असताना एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच आमदार क्रिष्णा गजबे व इतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन वृक्षतोडीला विरोध करून ग्रामस्थांचे समर्थन केले. मात्र त्यानंतरही वृक्षतोड थांबली नाही. त्यामुळे संतप्त झालेले सात गावातील हजारो नागरिक मोर्चादरम्यान रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये शिवसेनेचे देसाईगंज तालुका प्रमुख नंदू चावला, ग्रामीण तालुका प्रमुख विजय बुल्ले, युवा सेनेचे प्रमुख प्रशांत किलनाके, शिवसेना शहर प्रमुख सचिन वानखेडे, रमेश गरमळे, नितीन शंभरकर, होमराज हाळगुळे, श्यामराव वालदे, अशोक ठाकरे, हिरामन गराटे, सूमन धोंगळे, मुखरू राऊत, काशिनाथ दोनाडकर, वैरागडच्या सरपंच गौरी सोमनानी, श्रीराम अहीरकर, वसुधा सावे, घनश्याम प्रधान, शरद दोनाडकर, काशिनाथ नारनवरे, विश्वनाथ उईके, बकाराम नारनवरे, ओमप्रकाश ठेंगरी, जगदीश परसवानी, अहीरकर, विठ्ठल धोटे आदीसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चकऱ्यांनी सात गावांच्या जंगल क्षेत्रातील वृक्षतोड तत्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही प्रशासनाला यावेळी दिला. (वार्ताहर)एसडीओंशी मोर्चेकऱ्यांची चर्चाशिवसेनेचे शिष्टमंडळ व नागरिकांनी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. एफडीसीएममार्फत या सात गावात होणारी वृक्षतोड तत्काळ थांबविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. दरम्यान उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी लोकांच्या इतक्या तक्रारी असतानासुद्धा वन विकास महामंडळाकडून वृक्षतोड का थांबविण्यात येत नाही, यासंदर्भाची कारणे विचारून यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.
जंगल बचाव, एफडीसीएम हटाव
By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST