दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ, टास्कफोर्स पथकाची कारवाई गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चामोर्शी तालुक्याच्या जामगिरी जंगल परिसरात सोमवारी धाड टाकून मोहफूल दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला व येथून १ लाख ५९ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दारूविक्रेते आरोपी फरार झाले आहेत. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे व टास्कफोर्सचे पोलीस उपनिरीक्ष सतीश सिरसाट व त्यांच्या सहकार्यांनी चामोर्शी तालुक्याच्या जामगिरी जंगल परिसरात धाड टाकली. यावेळी विकास मंडल व प्रकाश मंडल दोघेही रा. नवग्राम व काही इसम हातभट्टीची मोहफुलाची दारू गाळत होते. पोलीस आल्याची चाहूल लागताच सदर दोन व इतर पाच ते सहा इसम घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळावर पाहणी केली असता, १२ मोठे ड्रम, मोहफूल सडवा, १०० लिटर मोहफुलाची दारू, सायकल, फावळा, कुऱ्हाड, लोखंडी नळी व दारू गाळण्याचा चाटू असा एकूण १ लाख ५९ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सदर सर्व साहित्य जप्त केले असून फरार दारूविक्रेत्या आरोपींचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, हरिदास राऊत, विजय राऊत, नाईक पोलीस शिपाई दीपक डोंगरे, संदीप अमृतकर यांनी सहकार्य केले. गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असूनही दुर्गम भागात मोहफूल दारूचे अड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली, चामोर्शी, घोट, आष्टी पोलिसांनी जंगल भागातील मोहफूल दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे मोहफूल दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जामगिरी जंगलातील दारूअड्डा उद्ध्वस्त
By admin | Updated: August 3, 2016 02:11 IST