लोकमत विशेषगडचिरोली : वनाचे संवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीस्थळी राहून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत नसल्याने वैरागड, कढोली परिसरात अवैध वृक्षतोड व शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड व कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरातील वनकर्मचारी जिल्हा व तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. परिणामी कर्तव्याकडे या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही जातीने लक्ष घालून मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचे नियंत्रण हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाही. त्यामुळे वन व वन्य प्राण्यांचे रक्षण होत नसल्याचे परिसरातील अवैध वृक्षतोड व वन्य प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीवरून दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक मुख्यालयी राहत असून या उपवन क्षेत्रातील चारही वनरक्षक मुख्यालयी न राहता, बाहेरून ये-जा करतात. देलनवाडी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी हे स्वत:च मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे या वनपरिक्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे फावले आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे भरदिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. त्यानंतर रात्री जंगलातून बैलगाडी व इतर साधनांच्या सहाय्याने इमारती लाकूड तसेच इतर मौल्यवान लाकडाची अवैध वाहतूक केली जाते. सदर गोरखधंदा या परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याकडे उपवन क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या परिसरात मौल्यवान सागवान, येन, बिजा व इतर लाकडांचा समावेश आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे येथील जंगलाचे प्रमाण विरळ झाले आहे. अवैध वृक्षतोड होत असतानाही तस्करांवर कारवाई करण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसून येत आहे. शनिवार, रविववार या सुटीच्या दिवशी वनकर्मचारी सुटीवर असतात. त्यामुळे अनेकदा याची संधी साधून वनतस्करी केली जात आहे. बाहेर गावाहून अनेकजण पक्ष्यांची शिकार करण्यासाठी येत असून भरदिवसा येथे पक्ष्यांची शिकार करून ते गावागावात विकल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने अशा घटना वैरागड, कढोली परिसरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)
अवैध वृक्षतोड, शिकारीत वाढ
By admin | Updated: February 26, 2015 01:42 IST