एटापल्ली येथील गॅस पुरवठा प्रकरण : तहसीलदारांकडून पंचनामाएटापल्ली : येथील पवन गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार एटापल्लीचे नायब तहसीलदार डी. आर. मेत्रे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने सोमवारी गॅस एजन्सीला भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान या चौकशीत सदर गॅस एजन्सीमध्ये मोठी अनियमितता आढळून आली असून चौकशी अधिकाऱ्यांनी तब्बल १७ त्रुट्या काढल्या. व या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. पवन गॅस एजन्सीच्या जागेत दर्शनी भागात साठा, भाव, प्रलंबित ग्राहक संख्या तसेच दिनांक याबाबतचे फलक लावण्यात आले नाही. तसेच नमुन्यातील सर्व रजिस्टर परिमंडल अधिकारी यांच्याकडून स्वाक्षरी व शिक्के करून घेतलेले एकही रजिस्टर आढळून आले नाही. केवळ वितरणाच्या कच्च्या नोंदी असलेले एक रजिस्टर या चौकशीत आढळून आले. एजन्सीमध्ये सूचना पुस्तक व तक्रार पुस्तक तसेच साठापुस्तक, गॅस रिफिल बुकिंग यादी, नवीन गॅस नोंदणी रजिस्टर, दुबार सिलिंडर पुरवठा प्रतीक्षा यादी आदी बाबी आढळून आल्या नाहीत. कॅश अॅन्ड कॅरी योजनेत ग्राहकांना पाच रूपयांची सवलत तसेच काही ग्राहकांना कॅश मेमो देण्यात आले नसल्याचे दिसून आले. नियतनानुसार गॅस सिलिंडर व वितरकाने बयानात सांगितलेल्या वितरणाच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळून आली. ‘नवीन गॅस कनेक्शनबरोबर गॅस शेगडी घेणे सक्तीचे नाही’. असा सुस्पष्ट फलक दर्शनी भागावर लावलेला नाही. गॅस सिलिंडरच्या अधिकृत विक्री किमतीबाबतचा फलक, संबंधित गॅस एजन्सीचे सेल्स आॅफिसरचे दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक दर्शविणारे फलक एजन्सीमध्ये लावण्यात आले नसल्याचे या चौकशीत आढळून आले. वितरकाने शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचेही या चौकशीत आढळून आले. असा अहवाल एटापल्लीचे नायब तहसीलदार डी. आर. म्हेत्रे, पुरवठा निरीक्षक आनंद पडोळे व धान्य खरेदी निरीक्षक एस. ए. मेश्राम यांनी बुधवारी एटापल्लीचे तहसीलदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे. चौकशीत सदर गॅस एजन्सीमध्ये भरलेले सहा घरगुती सिलिंडर, रिकामे २७८ घरगुती सिलिंडर व दोन औद्योगिक रिकामे सिलिंडर असे एकूण २८६ सिलिंडर आढळून आले असून १४ सिलिंडरचा तुटवडा दिसून आला. (तालुका प्रतिनिधी)
चौकशीत अनियमितता स्पष्ट
By admin | Updated: July 30, 2015 01:24 IST