गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील येवली येथे शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना वैरण, ज्वारी, धान, रामकेळ आदी पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विषयतज्ज्ञ प्रा. डी. एन. अनोकार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, हरी कुनघाडकर, लोमेश कोहळे, कमलाकर भांडेकर, सुरेश भोयर, विश्वनाथ भांडेकर, प्रमोद भांडेकर, पांडूरंग भोयर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणात शेतकऱ्यांना वैरण, ज्वारी, धान, रामकेळ लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली. सुधारित हरभरा वाण जॅकी ९,२१८ लागवड, काढणी, साठवणूक तंत्रज्ञानाविषयी माहिती तसेच पीके व्ही क्रांति ज्वारी लागवडीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तज्ज्ञांसमोर पीक लावगडीबाबतच्या समस्या मांडल्या. तसेच सुधारित नवीन वाणांविषयी माहिती जाणून घेतली. शेतकरी व तज्ज्ञांनी येवली नजीकच्या शेतला भेट देऊन येथील पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी उच्च प्रतिच्या वाणांची निवड करून भरघोस उत्पादन घ्यावे, यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा व त्यानुसार पिकांची लागवड करावी, असे आवाहन अनोकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहाय्यक सातार तर आभार कृषी सहाय्यक एन. बी. लांडगे यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी राजू भोयर, गणपत भोयर तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकऱ्यांना शेतकी किटचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी माहिती व्हावी, तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा याकरिता शेतकऱ्यांना सुधारित वाण, फळभाज्या लागवड तसेच भाजीपाला लागवडीची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना सुधारित वाणांची माहिती
By admin | Updated: March 22, 2015 00:34 IST