गडचिराेली : परंपरागत कृषी विकास याेजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत १८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सेंद्रीय शेती उत्पादन विक्री मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम उपस्थित हाेते. प्रास्ताविकातून संदीप कऱ्हाळे यांनी मेळाव्याच्या आयाेजनाची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर, मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. गडचिराेली तालुक्यातील जिजाई सेंद्रीय पुरुष बचत गट नगरी यांना सेंद्रीय शेतीअंतर्गत अर्थसाहाय्याने खरेदी केलेल्या मालवाहक वाहनाची चावी गटाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांचे प्रतिनिधी यज्ञेश म्हशाखेत्री यांना साेपविण्यात आली. सेंद्रीय शेती गटामार्फत उत्पादित मालाच्या दालनास भेट देऊन पाहणी केली.
सेंद्रीय शेतीचे महत्त्व व सेंद्रीय उत्पादनाचे दरराेजच्या वापरातील फायदे याविषयी संदीप कऱ्हाळे यांनी समजावून सांगितले, तसेच कृषी चिकित्सालय व फळ राेपवाटिकेतील सेंद्रीय शेती उत्पादन-विक्री मेळाव्यास भेट देऊन सेंद्रीय शेती उत्पादनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डाॅ.अभिजीत कापगते यांनी मानले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक जिजाई सेंद्रीय पुरुष बचत गट, भुईमूग सेंद्रीय बचत गट अहेरी, कृषी शेतकरी मंडळ कुरखेडा, ओम साई सेंद्रीय शेतकरी गट चामाेर्शी, जय बंडेखंडी सेंद्रीय उत्पादक शेतकरी बचत गट एटापल्ली आदी पाच सेंद्रीय शेती बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व शेतकरी उपस्थित हाेते.
बाॅक्स ....
सेंद्रीय शेतमालासाठी बाजारपेठ निर्माण करा
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासह रबी हंगामातील क्षेत्र वाढविण्यास भर द्यावा. सिंचन क्षेत्रात वाढ करून सेंद्रीय भाजीपाला लागवड करावी. जमिनीचे संवर्धन करावे, दुर्गम व अतिदुर्गम भागात यांत्रिकीकरणाद्वारे शेती करण्यावर भर द्यावा. सेंद्रीय शेती याेजनेच्या अनुषंगाने बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आत्मा व कृषी विभागाने आवश्यक उपाययाेजना कराव्या, तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.