काेरची : गडचिरोली पोलीस दलामार्फत वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा हॉलिबॉल स्पर्धा १७ फेब्रुवारी राेजी बुधवारला पोलीस स्टेशन कोरचीच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले. आदिवासीबहुल ग्रामीण क्षेत्रातील युवकांना आपल्या कलागुणांना समोर ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे दरवर्षीच पोलीस स्टेशनस्तरावर अशा खेळांचे आयोजन केले जात आहे. या खेळांमधून प्रथम आलेल्या संघांना जिल्हास्तरावर पाठविले जाणार आहे.
या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील अतिसंवेदनशील बोंडे, बेलारगोंदी, हितकसा, भर्रीटोला, गावातील चमू कबड्डी व्हाॅलिबॉल खेडण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती. या संघांना गावातील पोलीस पाटलांकडून निमंत्रण देऊन त्यांना अशा विविध स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जातो.
रोख पारितोषिक प्रथम बक्षीस ३ हजार, द्वितीय बक्षीस २ हजार, तृतीय बक्षीस १ हजार रुपये असे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कोरचीचे नायब तहसीलदार बी.एन. नारनवरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर कबड्डीच्या सामन्याला सुरुवात झाली. या कबड्डीच्या सामन्याची सुरुवात तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी टॉस करून केले. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी आदी उपस्थित हाेते. कुरखेडाचे पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार छगनलाल भंडारी, नायब तहसीलदार बी.एन. नारनवरे, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल अंबादे आदी उपस्थित हाेते.