कमलापूर कॅम्पमध्ये चाराकटरची कमतरता : तीन हत्तींचे नागपूर येथे होणार स्थानांतरणकमलापूर : येथील हत्तीकॅम्पमध्ये चाराकटर व महावत यांची निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे हत्तींची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. कमलापूर येथील हत्तीकॅम्पमध्ये अजित, बसंती, मंगला, राणी, प्रियंका, गणेश व आदित्य हे सात हत्ती आहेत. हत्तीचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येक हत्तीमागे एक महावत व दोन चाराकटर असणे आवश्यक आहे. हत्तींची संख्या लक्षात घेता या कॅम्पमध्ये सात महावत व १४ चाराकटर असणे अत्यंत गरजेचे आहे. तेवढी पदे मंजूर सुध्दा आहेत. परंतु या ठिकाणी सद्यस्थितीत तीन महावत व दोन चाराकटर आहेत. चार महावत व १२ चाराकटरची पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने देखभालीकडे होत चालले आहे. याबाबत वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, हत्तीकॅम्पवर रोजंदारीने मजूर लावण्यात आले आहेत, अशी माहिती दिली. २०१३ मध्ये पेंटा आत्राम या महावताचा अजित हत्तीने जीव घेतला होता. हत्ती कधीही कुणावरही हल्ला करू शकतो. हत्तींना वटणीवर आणण्यासाठी योग्य प्रकारचे प्रशिक्षित महावत असणे अत्यंत गरजेचे आहे. येथील तीन हत्तींचे नागपूर पेंच अभयारण्यात स्थानांतरण करण्याचा प्रस्ताव आहे व वन विभागाने मंजुरी दिल्याचीही माहिती आहे. हत्तींच्या योग्य देखभालीसाठी या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
रिक्त पदांमुळे हत्तींकडे दुर्लक्ष
By admin | Updated: June 20, 2016 01:11 IST