परिस्थिती बिकट : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात शेतकऱ्यांसमोर संकटभामरागड : तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपले जनावरे जगो की मरो या आशेवर जंगलात मोकाट सोडून दिली आहे. जंगलातही पाण्याचे स्रोत फारसे राहिलेले नाहीत. त्यामुळे शेकडो जनावरे जंगलातही मेलेले आहेत. आपलं जनावरं वाचलं की मेलं हे पाहण्यासाठी जाण्याची हिंमतही शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. इतकी बिकट परिस्थिती भामरागड तालुक्यात आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. अनेक गावाजवळून मोठ्या व लहान नद्या, नाले वाहतात. परंतु यावर्षी या गावामध्येही पाणी टंचाईची समस्या बिकट आहे. ज्या गावात नदी आहे. त्या नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे झाले आहे. मे महिन्यात तर नदीचा मुख्य डोहही कोरडा होईल, अशी माहिती गावातील जुन्या लोकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली, अशी परिस्थिती गेल्या १८ वर्षात पाहिलेली नाही, असेही लोक सांगत आहे. गुराढोरांना पाणी पाजण्याचा गंभीर प्रश्न असून जंगलातही आता मुबलक चारा राहिलेला नाही. आदिवासी बहूल भागात गावातील लोक शेतीचे कामे संपल्यानंतर पीक हाती येईपर्यंत गुरे चारण्याचे काम करतात परंतु जंगलही मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत बैल जगवायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यानाही भेडसावत आहे. गावातील बोअरवेलचे गुंडभर पाणी घेण्यासाठी पहाटे ४ वाजतापासून महिलांची गर्दी असते. तर गुरांना पाणी पाजायचे कुठे म्हणून गावकऱ्यांनी मार्च महिन्यातच जनावरे जंगलात सोडून दिले आहे. काही जनावरे इंद्रावती, पामूलगौतम, पर्लकोटा, बांडीया नदीच्या किनाऱ्यावर सोडले. अनेक गावांसाठी नदी ३० किमी अंतरावर पडते. जंगलातील तलाव, मालगुजारी तलाव, वनतलावही नसलेले अनेक गाव आहेत. या गावातील जनावरांचे हाल आहेत. ऐवढ्या नद्या असुनही यावर्षी नद्यांचे पात्र कोरडे झाले. जंगलात शेतकऱ्यांनी सोडलेले जनावरे मरून पडले आहे. तालुक्याच्या काही भागात प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी अनेक जनावरे मेलेले दिसले. तर खंडेनैनवाडी, मरदूर, कुचेर, वटेली या गावात तलाव नाहीत. बोअरवेलही आटलेल्या आहे. येथे केवळ मानसांना पिण्यापुरतेच पाणी मिळते. तेथे जनावरे पोसायचे कसे म्हणून जंगलात सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनावरे जगवायची कशी?
By admin | Updated: May 5, 2016 00:12 IST