६० हजारांचे नुकसान : शॉर्टसर्कीटमुळे लागली आग लोकमत न्यूज नेटवर्क जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा नजीकच्या पाथरगोटा येथील शेतकरी सिताराम प्रधान यांच्या घराला शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटने आग लागली. यात घरातील साहित्य जळून खाक झाल्याने प्रधान यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सिताराम प्रधान यांच्या घराला शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. आग लागलेल्या ठिकाणाजवळ तणीस असल्याने आग प्रचंड प्रमाणात वाढली. यात प्रधान यांचे १० पोते धान, कडधान्य, दैनंदिन वापरावयाचे कपडे, घरावरील कौलारू छत जळून खाक झाले. यामुळे प्रधान यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले. तलाठी अर्चना टिचकुले, पोलीस पाटील अर्चना राऊत यांनी जळालेल्या घराचा पंचनामा केला. यावेळी ग्रा.पं. सदस्य तन्वी कराकर देवचंद कुथे, शंकर नखाते, काशिनाथ ठाकरे, यादव राऊत आदी उपस्थित होते. नुकसानग्रस्त सिताराम प्रधान यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पाथरगोटा येथील नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात घराला तसेच तणसीच्या ढिगाला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्थळावर अग्नीशमन वाहन उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांकडून होत आहे.
पाथरगोटा येथे घर जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 01:45 IST