गोगावात शुक्रवारी नागोबा यात्रा : दरवर्षी उसळते नागरिकांची गर्दी गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव (अडपल्ली) येथे दरवर्षी रथसप्तमीनिमित्त नागोबा देवस्थानात यात्रा भरविली जाते. या निमित्ताने दोन दिवस अगोदर घोड्याच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. यंदा अडपल्ली येथून बुधवारी घोड्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान गावातील महिला व बालकांनी दर्शन घेतले. यावर्षी ३ फेब्रुवारीला गोगाव येथील नागोबा देवस्थानात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोगाव येथील नागोबा देवस्थानातील यात्रेनिमित्त दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील विरखल येथून संतोष मोरांडे यांच्या घरून घोड्याची मूर्ती आणली जाते. यंदा घोड्याची मूर्ती आणल्यानंतर सोमाजी फुलझेले यांच्या घरी पूजापाठ करण्याकरिता ठेवण्यात आली. त्यानंतर सदर मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक अडपल्लीसह गोगावातील अनेक वॉर्डांतून फिरविण्यात आली. मिरवणुकीदरम्यान अनेक महिलांनी मूर्तीची पूजा केली. तसेच पालखीचे दर्शन घेतले. दरवर्षी या पालखीतून लहान बालकांना ओलांडून घेऊन फेरा मारला जातो. त्यामुळे सुख, समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मागील तीन पिढ्यांपासून गावात नागोबा देवस्थानात यात्रा आयोजित केली जात आहे. या यात्रेला भाविकांची गर्दी उसळत असते. यात्रा यशस्वीरित्या पार पाडली जाईल याकरिता गोगाव ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची तसेच वाहनांसाठी पार्र्किंगची विशेष व्यवस्था केली जाते. त्यामुळेच नागोबा देवस्थानात होणाऱ्या एक दिवसीय यात्रेत दिवसेंदिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. सभोवतालच्या गावातील भाविकांची गर्दी वाढत आहे. (शहर प्रतिनिधी)
अडपल्लीत घोड्याची मिरवणूक
By admin | Updated: February 2, 2017 01:33 IST