सिरोंचा : आठवडी बाजाराच्या वर्दळीत सापडलेले ५० हजार रूपयांचे बंडल मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा प्रत्यय एका दूध विक्रेत्या ग्रामीण तरूणीने आणून दिला. सदर तरूणीचे नाव सम्मक्का राजन्ना राजारपू (३३) असून ती येथून पाच किमी अंतरावरील रामांजपूर टोला येथील रहिवासी आहे. तिच्या माहेरी व सासरी पिढीजात दूध विक्रीचा व्यवसाय आहे. आठवडी बाजारासाठी सिरोंचा येथे आलेल्या सम्मक्काला रस्त्यावर नोटांचे पुळके आढळले. त्यावेळी तिचा ११ वर्षीय मुलगा विनय सोबत होता. रकमेच्या मालकीबद्दल सम्मक्का आजुबाजूला विचारणा करीत असतानाच तेथे आलेल्या एका इसमाने स्वत:चे असल्याचे सांगितले. ओळख व खात्री पटल्यावर सम्मक्काने पूर्ण रक्कम साक्षीदारासमक्ष परत केली. घटनास्थळावर मोजणी केली असता, ही रक्कम ५० हजार रूपये भरली. मूळ मालक सम्मय्या गुडा असून तो मद्दीकुंटा येथील रहिवासी आहे. यावेळी बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कमही सम्मक्काने सात्विकपणे नाकारली. एकीकडे पैसे कमविण्याच्या नादात लोक अनैतिक मार्ग अवलंबित असल्याचे चित्र समाजात सर्वत्र दिसत असताना ग्रामीण भागात अजूनही लोकांमध्ये प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे सम्मक्काच्या कृतीतून दिसून आले आहे. ५० हजारसारखी मोठी रक्कम या युवतीने सहजपणे ज्याची त्याला परत केली. सदर युवतीचे अनेकांनी कौतुक केले.
दूध विक्रेत्या तरूणीचा प्रामाणिकपणा
By admin | Updated: February 26, 2015 01:38 IST