विजय वडेट्टीवार यांची माहिती : आघाडीत २५ सदस्य असल्याचा दावा गडचिरोली : भाजप-राकाँ युतीचा जिल्हा परिषदेतील गट कायद्याने नोंदणीकृत होऊ शकत नाही. गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांची ही सत्ता स्थापन करण्याची राजकीय खेळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून काँग्रेस-राकाँ आघाडीची सत्ता गडचिरोली जिल्हा परिषदेवर स्थापन करणार, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँगे्रसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम आदींसह काँग्रेसचे नवनिर्वाचित जि. प. सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना आ. वडेट्टीवार यांनी सांगितले की, भाजप व काँग्रेसचा जि. प. युतीचा अधिकृत गट नाही. काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष मिळून आजघडीस जि. प. तील २५ सदस्य संख्या आहे. केंद्र व राज्यपातळीवरील काँग्रेस व राकाँ पक्षाच्या नेत्यांशी गडचिरोली जि. प. मध्ये आघाडी करण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. काँग्रेस व राकाँची आघाडी महाराष्ट्रभर होणार असून यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्यस्तरावरून होईल, असेही ते म्हणाले. काँग्रेस प्रमाणेच राकाँ धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे जातीयवादी भाजपशी जिल्हा परिषदेत युती करणार नाही, असा आमचा विश्वास आहे. तसेच धर्मरावबाबांनी जातीयवादी पक्षासोबत न जाता समविचारी काँग्रेस पक्षासोबत यावे, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस, राकाँ, आविसं आघाडीची गडचिरोली जि. प. वर सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसतर्फे सर्वप्रथम आघाडीचा प्रस्ताव गडचिरोली जि. प. मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राकाँ अशी आघाडी व्हावी, यासंदर्भातील प्रस्ताव काँग्रेसतर्फे आम्ही सर्वप्रथम राकाँचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाब आत्राम यांच्याकडे दिला. काँग्रेस-राकाँ आघाडी होण्यासंदर्भात सुरुवातीपासूनच त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. तडजोडीची भाषा त्यांच्याशी करण्यात आली आहे. जि.. प. तील भाजप-राकाँ युतीबाबतची भूमिका भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र राकाँकडून यात स्पष्टता नाही. त्यामुळे या युतीवर प्रश्नचिन्ह आहे, असे ते म्हणाले.
राकाँ-आविसंला सोबत घेऊन जि. प.मध्ये सत्ता स्थापन करू
By admin | Updated: March 2, 2017 01:55 IST