सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया : औरंगाबादनंतर राज्यातही सक्ती लागू करण्याचे संकेतगडचिरोली : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे बुधवारी एका कार्यक्रमात राज्यभर हेल्मेटसक्ती करण्याबाबत संकेत दिले आहेत. दरवर्षी देशात हजारो नागरिकांचा दुचाकी अपघातात हेल्मेट नसल्याच्या कारणावरून मृत्यू होतो. हेल्मेट सक्तीचे झाल्यास अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया या निर्णयावर सर्वसामान्यांमध्ये उमटली आहे. गडचिरोली येथील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडांगे म्हणाले, हेल्मेट हे वाहनचालकांना सक्तीचे असायलाच हवे, नव्हे तर हेल्मेट घातल्याने वाहनचालकाच्या सुरक्षेचे चांगले कवच निर्माण होईल, आज अपघातात अनेक जण दगावतात. डोक्याला जबर दुखापत होऊन काहींना आयुष्यभर अधू जीवन जगावे लागते. यासाठी हेल्मेट सक्तीचे व्हायलाच हवे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी औरंगाबाद येथे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे संकेत दिले. हेल्मेटमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. अपघात झालाही तरी संबंधित वाहनचालकांना जास्त प्रमाणात धोका पोहोचणार नाही, या निर्णयाची गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी व्हावी. शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वाहनचालक हेल्मेट वापरत नसल्यामुळे आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात बरेचजण दगावले. अपघातातील बळींची संख्या कमी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटसक्ती आवश्यक आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. यासोबतच राज्य शासनाने जिल्ह्यातील रस्त्याच्या स्थितीबाबत गांभीर्याने विचार करावा. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी किलनाके म्हणाल्या, हेल्मेटअभावी, वाहनांचा प्रवास जीवघेणा व धोक्याचा आहे. अपघातात डोक्याला दुखापत झाल्यावर बचावण्याची शक्यता कमी असते. अपघातात डोक्याला मार लागल्यावर दुरूस्तीनंतरही संबंधित वाहनचालकाला लकवा व इतर आजार होऊ शकतात. हेल्मेटच्या वापरामुळे मृत्यू टळू शकतो, त्यामुळे हेल्मेट घालणे आवश्यक आहे. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वाहनचालकांना हेल्मेटसक्ती आवश्यक आहे. याशिवाय चारचाकी वाहनचालकांनी सिटबेल्ट आवर्जून लावावे, या नियमाचे भंग करणाऱ्या वाहनचालकांवर परिवहन व पोलीस विभागामार्फत कारवाई व्हावी. जिल्हा महिला कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे म्हणाल्या, जिल्ह्यात महिला व युवती वाहनचालकांचेही अपघात वाढले आहेत. महिला युवतींसह सर्वच वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करणे आवश्यक आहे. यातून संरक्षण चांगल्या प्रकारे होते. गडचिरोलीचे नगरसेवक संजय मेश्राम म्हणाले, गेल्या दोन- तीन वर्षांत जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांचा बळीही गेला. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करावी. (स्थानिक प्रतिनिधी)
हेल्मेटसक्ती असायलाच हवी
By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST