रुग्णांची हेळसांड : पळसगाव आरोग्य पथकातील प्रकारजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरापासून जवळच असलेल्या पळसगाव येथे प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी व औषध निर्मात्यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रुग्णांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी येथील कंत्राटी आरोग्यसेविकेवर सोपविली जाते. दरम्यान, कंत्राटी आरोग्य सेविकाच डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी निदर्शनास आला.आरमोरी तालुक्यात वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत जोगीसाखरा येथे प्राथमिक आरोग्य पथक असून या ठिकाणी एमबीबीएस पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. २० आॅगस्ट रोजी गुरूवारला या पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम हे आरोग्य विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने गडचिरोली येथे जिल्हा मुख्यालयाला गेले होते. तर औषधनिर्माता हे सकाळी ११.१५ वाजता दवाखान्यात हजर झाले. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते दवाखान्यातून निघून गेले. डॉक्टर व औषधनिर्माताच्या अनुपस्थितीत या पथकातील कंत्राटी आरोग्यसेविका रजनी वाघमारे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम यांच्या सांगण्यावरून रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला. विशेष म्हणजे आरोग्यसेविका वाघमारे यांनी गुरूवारी सकाळी व सांयकाळच्या सुमारासची दोन्ही वेळेची ओपीडी सांभाळली. पळसगाव प्राथमिक आरोग्य पथकातील सायंकाळची ओपीडी आरोग्यसेविका वाघमारे यांच्याच भरवशावरच राहत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. अप्रशिक्षित आरोग्यसेविकेकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याने या भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन कंत्राटी आरोग्यसेविका व परिचर वगळता डॉक्टरांसहीत अन्य आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता, तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. (वार्ताहर)
कंत्राटी आरोग्यसेविकेच्या भरवशावरच आरोग्यसेवा
By admin | Updated: August 23, 2015 01:52 IST