गडचिरोली : मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला. आपल्याला वाढीव मोबदला कधी मिळणार याची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने १९८७-८८ मध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या. त्यावेळी या जमिनीस ३५ हजार रूपये एकर भाव देण्यात आला होता. त्यानंतर ३७ शेतकऱ्यांपैकी ८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. १ सप्टेंबर १९९४ ला न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला. या निकालाचा आधार घेऊन जमीन धारण कायद्याच्या कलम २८ अ नुसार वाढीव दर सर्वांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. २० वर्षांचा कालावधी उलटला. मात्र या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तडजोडीचे अधिकार दिले होते. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी महालोक अदालतीत या प्रकरणाची तडजोड घडवून आणू, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यानंतरही मोबदला मिळाला नाही. मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या २९ पैकी २३ शेतकऱ्यांचा आता मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा शेतकरी वृध्दावस्थेत पोहोचले असून आतातरी शासनाने वाढीव मोबदल्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राजू भोयर, राजू कोटगले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
२० वर्षांपासून त्यांना वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा
By admin | Updated: January 12, 2015 22:50 IST