समस्या निकाली : ५०० मीटरच्या रस्त्यावर झाले माती काम; पावसाळ्यातील फजितीपासून सुटकातळोधी (मो.) : येथून १ किमी अंतरावर असलेल्या विसापूर ग्रामपंचायती अंतर्गत हिवरगाव येथील ग्रामस्थांनी पौर नदी घाटावरील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रमदानातून माती काम करून ५०० मीटरचा रस्ता तयार केला. त्यामुळे या रस्त्याने शेताकडे जाण्याचा तसेच अंत्ययात्रेला जाण्यासाठी सुविधा झाली आहे. हिवरगाव येथील आनंदराव मनिराम बारसागडे यांनी श्रमदानातून सदर रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांपुढे मांडला. ग्रामस्थांनी याला होकार दर्शविल्यानंतर आनंदराव बारसागडे यांनी आपल्या शेतजमिनीतून रस्ता तयार करण्याचे निश्चित केले. त्यानुसार आनंदराव बारसागडे व इतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माती करून ५०० मीटरचा रस्ता तयार केला. हिवरगाव येथे काही दिवसांपूर्वीच केंद्रस्तरीय बाल क्रीडा संमेलन पार पडले. या संमेलनासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा केली होती. क्रीडा संमेलनाचा खर्च वजा झाल्यावर उर्वरित रक्कम रस्ता तयार करण्याच्या कामात खर्च करायचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार उरलेल्या वर्गणीच्या रक्कमेतून तसेच श्रमदानातून ५०० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला. याकरिता रागोजी बारसागडे, गुरूदेव बारसागडे, लक्ष्मण टिकले, बोंडकू नैताम, आनंदराव बारसागडे, दाजी बारसागडे, तुळशीराम बारसागडे, उमाजी बारसागडे, श्रीराम नैताम, दिलीप खोडवे, अतुल नैताम, बंडू बारसागडे, दिवाकर बारसागडे, पत्रू मोहुर्ले यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
हिवरगाववासीयांनी श्रमदानातून केला रस्ता तयार
By admin | Updated: December 23, 2015 01:46 IST