गडचिरोली : येथील डाक कार्यालयात लिपीक व पोस्टमास्टरचे मिळून १० पदे मंजूर आहेत. मात्र यातील केवळ ५ पदे भरण्यात आली असून ५ पदे रिक्त आहेत. निम्मी पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरावरील डाक कार्यालय असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रे या कार्यालयात जमा होतात. माहिती पाठविण्याची अनेक साधने उपलब्ध असली तरी पोस्टाची कामे कमी झाली नसून आर्थिक व्यवहार वाढत आहे. तसेच पोस्टाची कामे सुद्धा वाढत चालली आहेत. जिल्हास्तरावरील कार्यालय असल्याने राज्यातील नागरिकांनी पाठविलेली पत्रे सर्वप्रथम जिल्हा कार्यालयात जमा होतात. त्यानंतर त्यांचे तालुकास्थळी वितरण केले जाते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक युवक गडचिरोली येथे येऊन नोकरीचे अर्ज करतात. त्यामुळे या कार्यालयात नेहमीच युवकांची गर्दी दिसून येते. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने कामे वेगाने होत नाही. त्यामुळे युवकांना तासणतास रांगेत चाचपडत राहावे लागत आहे. १० पदांमध्ये लिपिकाची ९ पदे तर पोस्टमास्टरचे १ पद आहे. लिपीक वर्गीय ४ पदे रिक्त असून पोस्टमास्टरचेसुद्धा पद रिक्त आहे. मनुष्यबळ कमी असल्याने या ठिकाणी वेळेवर काम होत नाही. बऱ्याचवेळा युवकांना परीक्षेचे प्रवेशपत्र, मुलाखत पत्र उशीरा मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे कित्येक युवकांना परीक्षा व मुलाखतीपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी नोकरीही गमवावी लागत आहे. ही गंभीर बाब असून डाक विभागाने याकडे लक्ष घालून रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पोस्ट कार्यालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारितील कार्यालय आहे. गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश कर्मचारी येण्यास तयार नसल्याने पदे रिक्त आहेत. (नगर प्रतिनिधी)
डाक कार्यालयातील निम्मी पदे रिक्त
By admin | Updated: December 1, 2014 22:54 IST