कुरखेडा : तालुक्यातील गुरनाेली ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलने वर्चस्व मिळविले. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पॅनलच्या गटाने यश मिळविले. सरपंचपदी सुप्रिया तुलावी तर उपसरपंच मंगेश कऱ्हाडे यांची निवड झाली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ग्रामविकास परिवर्तन पॅनलने निवडणूक लढविली हाेती. यात परिवर्तन पॅनलला भरघाेस यश मिळाले. सरपंच, उपसरपंच पदग्रहण साेहळ्याला प्रणय खुणे, डाॅ.परशुराम खुणे, लक्ष्मण काेहळे, रियाज पठाण, देवानंद खुणे यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य याेगिता बुद्धे, अंजना नेवारे, शीतल भैसारे, सुरेखा तुमराम, सूरज सयाम उपस्थित हाेते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
बाेडधा ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात
काेरेगाव, चाेप : देसाईगंज तालुक्यातील बाेडधा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवित ग्रामपंचायत ताब्यात घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सात व बिनविराेध दाेन सदस्य निवडून आले हाेते. सरपंचपदी भाग्यश्री यशवंत गायकवाड तर उपसरपंचपदी राज महादेव गायकवाड यांची एकमताने निवड झाली. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर यापूर्वी भाजपची सत्ता हाेती.
महागाव खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
महागाव (बु.) : अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष समर्थित गटाने वर्चस्व मिळविले. निवडून आलेल्या उमेदवारांमधून सरपंचपदी रेणुका मधुकर आत्राम तर उपसरपंचपदी उमा रामलू मडगुलवार यांची बिनविराेध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.