गेदा येथे कृषी मेळावा : जि. प. च्या कृषी विभागाचा उपक्रमएटापल्ली : जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व पंचायत समिती एटापल्लीच्या वतीने बुधवारी गेदा येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कारू रापंजी, गेदाचे सरपंच हरीश पदा, तोडसाचे सरपंच मुन्नी दुर्वा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. बचतगटाच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे गावात उपलब्ध करून देण्याच्या मार्गदर्शक सूचना कंकडालवार यांनी केल्या. पशुधन विकास अधिकारी सोनटक्के यांनी मार्गदर्शन करताना गडचिरोली जिल्ह्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न केले जात नाही. येथील गायी व म्हशी अत्यंत कमी प्रमाणात दूध देतात. या गाई व म्हशींना चांगला आहार उपलब्ध करून दिल्यास दूध देण्याची क्षमता वाढेल, असे मार्गदर्शन केले. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना होणारे विविध आजार व आजारांपासून जनावरांना दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन केले. मेळाव्यात पशुंची औषधी, योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. संचालन मुख्याध्यापक शेषराव संगीडवार तर आभार मुख्याधापक प्रताबराव यांनी मानले.
शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन
By admin | Updated: February 27, 2016 01:43 IST