गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानातून कुजलेला व माती, खडे मिश्रीत गव्हाचा पुरवठा केला जात आहे. सदर गहू खाण्याजोगे नसल्याने गरीब नागरिकांना खुल्या बाजारपेठेतून गहू खरेदी करावे लागणार आहे. परिणामी गरीब नागरिकांची ऐन दिवाळीतच आर्थिक कोंडी झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांना १ हजार २०० स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात सुमारे ५६ हजार ८२० क्विंटल नियतन मंजूर करण्यात आले. दिवाळीच्या सणाला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण समजल्या जातो. दिवाळीपूर्वी प्रत्येक नागरिकाला स्वस्त धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने २८ आॅक्टोबर रोजीच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना गहू, तांदूळ व साखरेचा पुरवठा केला व सदर धान्य ७ नोव्हेंबरच्या पूर्वीच वितरित करण्याचे निर्देश दिले. धान्य प्राप्त होताच स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याच्या वितरणाला १ नोव्हेंबरपासूनच सुरुवात केली. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना प्राप्त झालेल्या एकूण गव्हापैकी सुमारे निम्मे गहू पाण्याने भिजलेले आढळून आले. हे गहू मागील अनेक दिवसांपासून गोदामामध्ये असल्याने त्यांच्यावर बुरशी चढली असून त्यांना काळपट रंग प्राप्त झाला आहे. या गव्हाचा कळवट वास येत आहे. गहू अत्यंत बारिक आहे. त्याचबरोबर या गव्हामध्ये माती, कोंडा, खडे आढळून आले आहेत. सदर गहू मानवाला खाण्यायोग्य तर नाहीच. त्याचबरोबर हा गहू जनावरे सुद्धा खाणार की नाही, असा प्रश्न निर्माण होते. मात्र दिवाळीचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. खुल्या बाजारातून गहू खरेदी करायला गेल्यास ३० रूपये प्रतिकिलो दर मोजावा लागतो. ५० रूपयात २५ किलो गहू मिळतात. त्याच गव्हासाठी ७०० ते ८०० रूपये खुल्या बाजारात द्यावे लागतात. त्यामुळे गहू कसाही असला तरी बरेच गरीब नागरिक खरेदी करीत आहेत. तर काही नागरिक मात्र सदर गहू खरेदी करण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याचा गहू स्वस्त धान्य दुकानातच पडून आहे. याची किंमत स्वस्त धान्य दुकानदाराला मोजून द्यावी लागणार आहे. खराब गव्हामुळे गरीब नागरिकासह स्वस्त धान्य दुकानदारसुद्धा अडचणीत आले आहेत. निम्मा गहू स्वस्त धान्य दुकानातच पडून आहे. याबाबत काही दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता, अन्न महामंडळानेच अशा प्रकारचा गहू पुरविला आहे. यामध्ये आपला काहीही दोष नाही, असे म्हणून हात झटकले जात आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यातही अशाच प्रकारचा गहू पुरविण्यात आला होता. मात्र कधीकधी असे प्रकार घडतात. ही बाब मान्य करून नागरिकांनी कोणतीही तक्रार केली नाही. मात्र सलग दोन महिने अशाच प्रकारच्या गव्हाचा पुरवठा केला जात असल्याने पुढील महिन्यातही असाच गहू मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने सदर गहू वापस बोलवून त्याऐवजी नवीन गहू तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)मागील महिन्यातही असाच गहू४आॅक्टोबर महिन्यातही अशाच प्रकारचा कुजलेला, काळपट व मातीयुक्त गहूू पुरविण्यात आला होता. मागील महिन्यातही बहुतांश नागरिकांनी गहू खरेदी केला नाही. त्यामुळे मागील महिन्याचाही गहू दुकानदारांकडे पडून आहे. तर नागरिकांना खुल्या बाजारपेठेतून गहू खरेदी करावा लागला. याची पुनर्रावृत्ती पुढील महिन्यातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरीब नागरिक धास्तावले आहेत.एपीएलचे धान्य बंद४मागील एक वर्षापासून एपीएलधारकांचे धान्य बंद केले आहे. सध्य:स्थितीत केवळ बीपीएलधारक, अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेत मोडणाऱ्या नागरिकांनाच धान्याचा पुरवठा केला जात आहे. एपीएलधारकांचे धान्य बंद केल्याने एपीएलधारक कुटुंबांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या कुटुंबांना पूर्वप्रमाणेच धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये पाणी गेलेल्या गव्हाचा पुरवठा झाला आहे. या गव्हाला शायनिंग नाही, त्यामुळे थोडा काळपट दिसतो. मात्र सदर गहू खाण्यायोग्य आहे. अगदी खराब गहू असल्यास सदर गहू एफसीआयकडे वापस पाठवून त्याऐवजी नवीन गव्हाचा पुरवठा केला जाईल. एफसीआयकडूनच अशा प्रकारचा गहू पुरविल्या जात आहे.- आर. आर. चांदुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली
कुजलेला गहू गरिबांच्या माथी
By admin | Updated: November 6, 2015 02:36 IST