विशेष घटक योजना : कृषी स्वावलंबन योजनेत रूपांतरित गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर, इनव्हेल बोअर व पंपसंच तसेच इतर बाबींचा लाभ दिला जात होता. मात्र याचे अनुदान अल्प होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नव्याने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत नव्या सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना अडीच लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. जि.प. मार्फत राबविण्यात येणारी विशेष घटक योजना आता गुंडाळण्यात आली असून सदर योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत परावर्तीत करण्यात आली आहे. या योजनेनुसार जुन्या विहीर दुरूस्तीसाठी ५० हजार, इनव्हेल बोअरसाठी २० हजार, पंप संचसाठी २५ हजार, वीज जोडणीसाठी १० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी १९८२-८३ पासून जि.प. अंतर्गत विशेष घटक योजना राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत पीक संरक्षण अवजारे निविष्ठा पुरवठा तसेच शेतीची अवजारे पुरविण्यात येत होती. (स्थानिक प्रतिनिधी)
सिंचन विहिरींचे अनुदान वाढले
By admin | Updated: January 22, 2017 01:35 IST