चर्चा : वाघाडे यांची सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात १९८१ पासून नक्षल कारवाया सुरू असून नक्षल-पोलीस चकमकीत कर्तव्यावर असणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. मात्र शासनाकडून शहीद कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या सोयीसवलतीमध्ये भेदभाव केला जात आहे. २००९ च्या शासन निर्णयानुसार २००९ पूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी शहीद कुटुंबीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष हेमलता वाघाडे यांनी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. हेमलता वाघाडे यांनी शहीद कुटुंबीयांसमावेत ना. मुगंटीवार यांची भेट घेतली. शहीद कुटुंबीयांच्या विविध समस्या वाघाडे यांनी ना. मुनगंटीवार यांच्यासमोर मांडल्या. याप्रसंगी अल्का रणदिवे, शबिना टेंभूर्णे, अनिता झरकर, वेणू बंडेवार, मडावी, मांदाळे आदी शहीद कुटुंबीय उपस्थित होते. जुन्या शहीद कुटुंबीयांच्या वारसनांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग १ व २ च्या शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी शहीद कुटुंबीयांनी केली.
जीआरनुसार जुन्या शहीद कुटुंबीयांना लाभ द्या
By admin | Updated: May 17, 2017 01:27 IST