चामोर्शी : मुुलचेरा तालुक्यात कार्यरत ग्रामसेवकाचा चामोर्शी येथील फलोद्यान नर्सरीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील रहिवासी असलेले भैय्याजी धोंडूजी धंदरे (३९) हे १३ मे रोजी चामोर्शी येथील तालुका कृषी कार्यालय नर्सरी परिसरात मृत अवस्थेत आढळून आले. १० मे रोजी दर्शनीमाल गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. तसेच ब्रेन हॅमरिजच्या आजारामुळे धंदरे हे गेल्या काही दिवसांपासून वेडसर अवस्थेत फिरत होते, अशी माहिती मिळाली आहे. चामोर्शी पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्य यशवंत गंगाराम धुळसे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धंदरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. व या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे. सदर ग्रामसेवक मुलचेरा तालुक्यात बोलेपल्ली ग्रा. पं. मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आरमोरी तालुक्यातील वासाळा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, आईवडील असा आप्त परिवार आहे.
मुलचेरा तालुक्यातील ग्रामसेवकाचा चामोर्शीत मृत्यू
By admin | Updated: May 14, 2015 01:15 IST