संघटनेची मागणी : विधानभवनावर मोर्चा धडकणारगडचिरोली : ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद, नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी तसेच पेंशन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनतर्फे १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील १२०० ते राज्यभरातील ३० ते ३५ हजार ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्यध्यक्ष विलास कुमरवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायतीच्या उत्पन्नानुसार व तेथील लोकसंख्येच्या आधारावर किमान वेतन लागू करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत मोडते. जि. प. व पं. स. प्रमाणेच ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. सरकारच्या तिजोरीवर भार पडणार असून ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्यास जि. प. व न. प. कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन लागू करावे, असेही कुमरवार यावेळी म्हणाले.पत्रकार परिषदेला गडचिरोली संघटनेचे गडचिरोली तालुकाध्यक्ष बाबुराव बावणे, सचिव खालचंद जांभुळकर, रवींद्र नागापुरे, नुरखा पठाण, सुनील डोईजड, भूपेश नागोसे, ज्ञानेश्वर ठाकरे, आकाश कोसरे, मनोज पेंदोरकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा
By admin | Updated: December 13, 2015 01:37 IST