गडचिरोली : पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असली तरी निरगट्ट झालेल्या पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत असून केवळ १५ दिवसात मानधन दिले जाईल असे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण केली जात आहे. वाढीव अनुदान लागू करण्यापूर्वी जुलै २०१३ पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार ३०० रूपये मानधन दिले जात होते. यातील ५० टक्के म्हणजेच ६५० रूपये मानधन ग्रामपंचायत देते. तर उर्वरित ५० टक्के मानधन राज्य शासनाकडून उपलब्ध होते. राज्यशासनाकडून गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अडीच वर्षापासूनच्या मानधनाची रक्कम डिसेंबर २०१३ मध्येच प्राप्त झाली आहे. मात्र पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत या मानधनाचे वाटप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले नाही. मागील १० महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचा उंबरठा झिजवून मानधन देण्याची याचना करीत आहेत. मात्र कर्मचारी नवीन असल्याने त्याला बिल काढता येत नाही, हेच कारण मागील १० महिन्यांपासून सांगत पानावर आणून हातावर खाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण करीत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला काम येत नसेल तर त्याला केवळ सही मारण्याचे पैसे शासन देतो काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंचायत समितीच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सदर काम येथील संवर्ग विकास अधिकारी का देत नाही, असाही प्रश्न ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित करीत आहेत. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाटप झाले आहे. गडचिरोली ही एकमेव पंचायत समिती आहे की, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन झाले नाही. कर्मचारी काम करीत नसल्याने हा गुंता मागील दहा महिन्यांपासून सुटला नाही. याचा अर्थ संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहीलेले नाही. असाही आरोप कर्मचारी युनियनने केला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० कुटुंब हालअपेष्ठेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून मानधनाचे वाटप तत्काळ करण्यासंबंधी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशीही मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन थकले
By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST