गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयातील आदिवासी तुकडीवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील एक वर्षापासून अनियमित वेतनामुळे त्रस्त झाले आहेत. चार महिन्यापसून वेतन न मिळाल्याने गृहकर्ज, पतसंस्थेचे कर्ज, एलआयसीचे हप्ते सर्व ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांवर आर्थिक ओढाताणीची वेळ आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार राज्य शासनाकडून केले जातात.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री तसेच स्थानिक आमदार यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण वेतनग्रस्त कर्मचाऱ्यांची समस्या अजूनही सुटलेली नाही. एकीकडे सर्व शिक्षकांचे वेतन नियमित होत असताना आदिवासी तुकडीवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नाही. शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.