लाभार्थी कुटुंबांचा सत्कार : २७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण भामरागड : भारत स्वच्छ मिशन (ग्रामीण) अंतर्गत भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा गावातील एकूण २७१ लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानातून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. या गावात आता वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढली असून या गावाची वाटचाल गोदरीमुक्तीकडे सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक शौचालय बांधकाम करणाऱ्या आरेवाडा गावातील लाभार्थी कुटुंब प्रमुखांचा तसेच ग्रा. पं. चे ग्रामसेवक मराठे यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन बुधवारी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती रंजना उईके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, पं. स. उपसभापती मालू मडावी, पं. स. सदस्य गंगाराम भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना बीडीओ फरेंद्र कुत्तरमारे म्हणाले, शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थी कुटुंबीयांनी या शौचालयाचा नियमित वापर करावा, जेणेकरून आपले घर व गाव स्वच्छ व सुंदर राहील. गाव स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी सामुहिकरित्या प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी पं. स. सभापती रंजना उईके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांनी केले. कार्यक्रमाला रमेश टिंगुसले, चव्हाण, गोरे, गव्हारे, कस्तुरे, पुसलवार, पंधरे आदींसह बहुसंख्य नागरिक हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
आरेवाडाची गोदरीमुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 01:02 IST