३७ टन वजनाचे वाहन चालविले : अत्याधुनिक यंत्रणेचा वापरसिरोंचा : गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोड टेस्टिंग करण्याच्या कामाला ६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपासून बॅरीकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ३० डिसेंबर २०१६ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागरराव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापूर्वीच या पुलावरून दरदिवशी रेतीने भरलेले शेकडो ट्रक ये-जा करीत होते. या ट्रकमुळे पुलाला धोका असल्याची ओरड निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडून स्पॅनलोड टेस्टिंगचे काम करण्यात येत आहे. विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम, शाखा अभियंता ए. ए. सय्यद, सहायक अभियंता विजय सेलोकर हे उपस्थित राहून काम पार पाडीत आहेत. यावेळी शाखा अभियंता ए. ए. सय्यद यांना लोकमत प्रतिनिधीने विचारणा केली असता, पुलावर गर्डरखाली रिडींग गेज लावून टेस्टिंगचे काम पार पाडल्या जात आहे. एका ट्रकमध्ये ३७ टन रेती भरून ट्रकचे लोड टेस्टिंग करण्यात येत आहे. लोडेड ट्रक, अनलोडेड ट्रक पुलावरून चालवून दोन्ही प्रकारे लोड टेस्टिंग केले जात आहे. एक ट्रकपासून लोड टेस्टिंग सुरू करून सहा ट्रकपर्यंत लोड टेस्टिंग प्रक्रिया चालणार आहे. पुलाचा एक गाडा ४५ मिटरचा आहे. पुलावर एकूण ३६ गाळे आहेत. पुलाची एकूण लांबी १ हजार ६२० मीटर आहे. रिडींग गेज लावून डिप्लेक्शनची मोजणी केली जात आहे. ४५ मीटरच्या गाड्याला सहा गर्डर असून प्रत्येक गर्डरला एक रिडींग गेज या प्रमाणे एकूण १८ रिडींग गेज लावण्यात आले आहेत. पुलाखाली लोखंडी कठडे उभारून गर्डरखाली लोखंडी प्लेट लावून त्या प्लेटवर रिडींग गेज मशीन लावली आहे. त्या माध्यातून डिप्लेक्शन नोंदणी केली जात आहे. सदर स्पॅन लोड टेस्टिंगचे काम बेंगलुर येथील काँक्रीट स्ट्रक्चरल फोरेन्सीक कन्सलटन्ट या कंपनीच्या मार्फतीने केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
गोदावरी पुलाची लोड टेस्टिंग सुरू
By admin | Updated: March 7, 2017 00:46 IST