मलेरिया नियंत्रणावर भर : आरोग्य संचालकाची माहिती; धानोरा ग्रामीण रूग्णालयाला भेटधानोरा : तालुक्यात वाढत असलेल्या मलेरिया रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार आहे, शिवाय मलेरिया निर्मुलनाच्या गोळ्या व डोज आरोग्य कर्मचारी सलग तीन दिवस गावात जाऊन रूग्णांना देणार आहेत. यासाठी जानेवारी २०१६ पासून तब्बल ८०० मलेरिया वर्कर काम करणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी दिली. रविवारी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार व आरोग्य विभागाचे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. रक्त तपासणीकरिता प्रयोगशाळा तंत्रज्ञांची संख्या वाढविण्यात येणार असून धानोराच्या ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ. पवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ६६९ गावे मलेरिया रोगाने प्रभावित आहेत, असे सांगितले. यावेळी संयुक्त संचालक डॉ. गणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले, डीपीएम अनुपम महेशगौरी, धानोराचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय साबने, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराय धुर्वे आदी उपस्थित होते. पेंढरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव तर गोडलवाही येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा पाटील उपस्थित होत्या.गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे आरोग्य संचालक डॉ. पाटील, सहायक संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. शनिवारी आरोग्य विभागाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन दिली. तसेच जननी सुरक्षा योजना, लसीकरण, मिशन इंद्रधनुष्य, साथरोग, कुष्ठरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम, शस्त्रक्रिया आदी बाबींचा आढावा घेतला. (तालुका प्रतिनिधी)पीएचसीचा घेतला आढावाराज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार व आरोग्य विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी पेंढरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच गोडलवाही, कारवाफा या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मरकेगाव व पुलखल गावांना भेटी देऊन तेथील आशा वर्कर, गरोदर माता, दार्इंसोबत चर्चा केली. आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देऊन त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी आरोग्याच्या प्रश्नांवर संवादही साधला.
अतिरिक्त मनुष्यबळ देणार
By admin | Updated: December 21, 2015 01:34 IST