अहेरी : अहेरी शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अहेरी गावात भूमीगत गटार योजना आणली जाणार आहे. या माध्यमातून अहेरीच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. शिवाय प्रथम ६० व नंतर ७०० गावांचा विकास आराखडा आदिवासी विकास विभागामार्फत तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समाधान शिबिरात ते शनिवारी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, तहसीलदार के. वाय. कुनारपवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, जिल्हा परिषद सभापती अजय कंकडालवार, सुवर्णा खरवडे, पं.स. सभापती रविना गावडे, सिरोंचाचे तहसीलदार मिश्रा, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. या समाधान शिबिरात ना. अम्ब्रीशराव आत्राम यांचा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, प्रकल्प अधिकारी सोनकवडे व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर या तिघांनी शाल श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ना. आत्राम यांनी शेती विकासासाठी सिंचन व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून २०० कोटी रूपयाचा निधी आपण आणणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्रातून आदिवासी मुलांना आयएएस, आयपीएस व आयएफएस परीक्षेचे मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील , अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शना कुळमेथे, संचालन निशाली मेश्राम तर आभार अर्चना नागमोते यांनी केले.
अहेरीच्या स्वच्छतेला प्राधान्य देणार
By admin | Updated: February 22, 2015 01:24 IST