गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील गैरआदिवासी नागरिकांची संख्या लक्षात घेता काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदावर गैरआदिवासी कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे व देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे केली आहे.
येत्या वर्षभरात गडचिराेली जिल्ह्यात नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका हाेणार आहेत. जिल्ह्यात काँग्रेसला पक्षसंघटन वाढविण्यास भरपूर वाव आहे. सामान्य माणसााला केंद्रस्थानी ठेवून विद्यमान राज्य शासनामार्फत अनेक याेजना राबविल्या जात आहेत. या याेजना सामान्य नागरिकांपर्यंत पाेहाेचविण्याविषयी चर्चा झाली. गडचिराेली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आदिवासी व गैरआदिवासींची संयुक्त बांधणी आवश्यक आहे. जिल्ह्यातील माेठ्या पदावर सर्वच वर्गाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, मात्र जिल्ह्यात खासदार-आमदारकीचे तिकीट, जिल्हाध्यक्षपद, नियाेजन समिती सदस्यपद विशिष्ट व्यक्तीलाच दिले जात आहे. त्यामुळे इतर व्यक्तींमध्ये नैराश्याची भावना निर्माण हाेण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी सर्व प्रवर्गातील व्यक्तींची नेमणूक करावी, अशी मागणी डाॅ. साळवे व माेटवानी यांनी केली आहे. ही बाब अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुवा यांनाही कळविली आहे.