ंगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केंद्र सरकारकडे केली. लोकसभेत बोलताना खा. अशोक नेते म्हणाले की, गडचिरोलीसह पूर्व विदर्भाच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंगाली समाज वास्तव्याला आहे. या समाजाला जातीचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. १९९० पूर्वी या समाजाला प्रमाणपत्र दिल्या जात होते. मात्र नंतर ते बंद झाले. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सनदशीर मार्गाने बंगाली बांधवांनी अनेकदा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र शासनाने अजूनपर्यंत याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बंगाली बांधवांना महाराष्ट्र राज्यात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, अशीही मागणी लोकसभेत खा. नेते यांनी केली. पश्विम बंगाल, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये या समाजाला जातीचे प्रमाणपत्र दिल्या जाते. त्याच पद्धतीने राज्यातही प्रमाणपत्र देण्यात यावे, असे खा. नेते यांनी सांगितले.गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून हा समाज वास्तव्याला आहे. मात्र त्यांना प्रमाणपत्र नसल्याने जमीनपट्टे मिळण्यापासून ते अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असेही खा. अशोक नेते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र द्या
By admin | Updated: May 14, 2015 01:14 IST