कत्तलीसाठी जाणारी ३१ जनावरे : नवेगाव रै. जवळ चामोर्शी पोलिसांनी पकडलीतळोधी (मो.) : कत्तलीसाठी जाणारी ३१ जनावरे चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून तालुक्यातील नवेगाव रै. येथे वाहनासह पकडली होती. पकडलेल्या जनावरांना तळोधी (मो.) येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. परंतु येथील एका गायीची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित ३० जनावरांना चंद्रपूर जिल्ह्यातील श्री उज्ज्वल गोरक्षण संस्था केंद्र लोहारा यांच्याकडे ७ आॅक्टोबर रोजी सुपूर्द करण्यात आले.तळोधी (मो.) येथील ग्राम पंचायतीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या ३१ जनावरांपैकी एका गायीचा मृत्यू झाला. त्यानंतर गायीच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व उर्वरित ३० जनावरांना पोलिसांच्या पुढाकाराने रितसर चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथील श्री उज्ज्वल गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. संस्थेकडे जनावरे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्याने अपराध क्रमांक ३०१५/२०१५ कलम ११ (अ) (फ) प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्ह्यात नोंद करण्यात आलेली जनावरे ग्राम पंचायतीने रितसर कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी दुपारी ४ वाजता संस्थेकडे सुपूर्द केले. जनावरे हस्तांतरणप्रसंगी सरपंच माधुरी अतुल सूरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, ग्रा. पं. सदस्य आनंदराव गेडाम, पोलीस पाटील अनिल कोठारे, ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले उपस्थित होते.हस्तांतरण प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी कोंडवाडा रखवालदार रूपेश कुनघाडकर व नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
पकडलेली जनावरे गोरक्षण संस्थेला सुपूर्द
By admin | Updated: October 9, 2015 01:57 IST