गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड केलेल्या गावांमध्ये जलसंधारणाच्या मोठ्या कामांसाठी जिल्हा परिषद सिंचाई व लघु सिंचन जलसंधारण विभागाला कंत्राटदार मिळत नसल्याने या दोन्ही विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला अद्यापही सुरूवातच करण्यात आली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. या दोन्ही विभागाचे जलसंधारणाचे कामे थंडबस्त्यात आहेत. पाणी टंचाई निर्मूलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत प्रशासनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याच्या १५२ गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार १५२ गावात एकूण चार हजार ११८ जलसंधारणाची कामे घेण्यात आली. १०८ कोटींच्या कामाचा हा आराखडा आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारणाच्या कामासाठी प्रशासनाकडे १०३ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार कामासाठी कंत्राटदार मिळेना
By admin | Updated: April 24, 2015 00:02 IST