चामोर्शी : मागील महिन्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे जिल्हाभरातील गावरान आंब्याचा बहर गळून पडला. त्यातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मेघ गर्जनेसह झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे गावरान आंबे गळून पडले. यामुळे यंदा पुरेशा वाढीअभावी गावरान आंब्याचे उत्पादन घटणार असून या आंब्याचे भाव गगणाला भिडणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यासह चामोर्शी तालुक्यात व आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरात गावरान आंब्याच्या झाडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावात जुन्या गावरान आंब्याच्या आमराई आहेत. सुरुवातीला निसर्गाच्या कृपेने योग्य वातावरण राहिल्यामुळे यावर्षी जिल्हाभरातील गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर आला. त्यावेळी यंदा जिल्ह्यात गावरान आंब्याचे उत्पादन भरघोस येणार, असा अंदाज अनेक नागरिकांनी व्यक्त केला होता. मात्र मागील महिन्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे आंब्याचा बहर गळून पडला. याशिवाय मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे झाडाला लागलेले आंबे पूर्णत: गळून पडले. देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे अनेक गावातील अमराईमध्ये आंब्याचा सळा पडला असल्याचे चित्र दिसून आले.हायब्रिड आंब्याच्या जशा प्रजाती आहेत, त्याचप्रमाणे गावठी आंब्याच्यासुद्धा विविध प्रजाती आहेत. यामध्ये गुट्टी, तेलकट, काकडी, गोड, गाडगी व करंजी आदी प्रजातीचे आंबे अनेक गावातील आमराईमध्ये आढळून येतात. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक आमराईमध्ये फारच जुने आंब्याचे झाडे असून या झाडांना जीर्णावस्था प्राप्त झाली आहे. परिणामी अनेक गावातील आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गावरान आंब्याला दोन वर्षातून एकदा भरघोस आंब्याचे फळ लागतात, असे अनेक जानकार सांगतात. गतवर्षीपेक्षा यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्हाभरातील आंब्याचे उत्पादन घटणार, अशी शक्यता अनेक जानकर व्यक्त करीत आहेत.गावरान आंब्याचे उत्पादन वाढून आंबा मालकांची व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृतीसह ठोस उपाययोजना राबविण्याची नितांत गरज आहे. तेव्हाच गावरान आंब्याचे अस्तित्व कायम राहील. आंबा पिकालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हाभरातील गावरान आंबे गळाले
By admin | Updated: April 9, 2015 01:27 IST