मुलचेरा : मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी कोपरअल्लीच्या रस्त्यावर नाकाबंदी करून वनविभागाच्या नाक्याजवळ दोन दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडून बनावट विदेशी दारू जप्त केल्याची घटना मंगळवारला घडली. पोलिसांनी या प्रकरणातील ३ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोपरअल्लीच्या रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना दोन दुचाकी पोलिसांच्या दिशेने भरधाव वेगाने येत असल्याचे दिसले. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी एमएच ३३ जे ७०५२ व एम. एच. ३३ के ७०७५ क्रमांकाच्या दोन्ही दुचाकींना अडविले. या दुचाकीवर असणारे प्रशांत प्रफूल सरकार रा. अडपल्ली, सुशिल जुगल भक्त रा. आनंदग्राम व हरिलाल हेमंत मिस्त्री रा. अडपल्ली ता. चामोर्शी या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या दारूच्या ३५ निपा, रॉयल कंपनीच्या ३८ निपा, मॅक्डाअॅल नं. १ कंपनीच्या १० निपा अशा एकूण ५३ निपा दारू आढळून आली. या दारूची किंमत १८ हजार ६०० रूपये आहे. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता, जप्त केलेली दारू बनावट असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत सरकार याला विचारपूस केली असता, त्याने सदरची विदेशी बनावट दारू आपण स्वत: आपल्या घरी तयार करून विक्री करीत असतो, अशी पोलिसांना कबुली दिली. यावरून पोलीस उपनिरिक्षक तुषार भदाणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आरोपी सरकार याच्या घरी धाड टाकून चौकशी केली असता, त्याच्या घरी बनावट दारू बनविण्याचे ५ लिटर द्रावण, ५० रिकाम्या बाटल, एक चाळी, ५० बूच व दारू तयार करण्याचे इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी सदर सर्व साहित्य जप्त केले आहे. तीनही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सुरेश तांगडे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक तुषार भदाणे, आनंद भगत, आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
बनावट दारू बनविणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: December 2, 2014 23:05 IST